लातूर : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना पदच्युत करण्यात आले आहे. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लातूरचे सहकार निबंधक श्रीकांत देशमुख यांनी या प्रकरणात निकाल दिला आहे. त्यानंतर बँकेचे चेअरमन आदित्य सारडा यांना अध्यक्ष पदावरून आणि संचालक पदावरून पदच्युत करण्यात आले आहे. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सरकार बदलल्यानंतर पंकजा मुंडे यांना सहकार विभागातून हा मोठा धक्का बसल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बीड जिल्हा मध्यवर्ती बँक हे भाजपच्या म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून या बँकेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे पंकजा मुंडे आणि विद्यमान भाजप सरकारने दुर्लक्ष केले होते. 


२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने बँकेचा निधी इतर खर्च केला, याबाबत शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी तक्रार केल्यानंतर तब्बल दोन वर्ष याची सुनावणी सुरु होती. दरम्यान राज्यात भाजप युतीचे सरकार गेल्यानंतर महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार आल्यानंतर बीड जिल्हा बँकेवर झालेली ही कारवाई म्हणजे पंकजा मुंडे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.