`माझी कामाची पद्धत वेगळी`, रिव्हॉल्वर- रिल आणि बीड... पालकमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम

Ajit Pawar Beed Visit : ... तर मकोका लावू; अजित पवार जरा स्पष्टच बोलले. बीडमधील परिस्थितीवर कटाक्ष टाकत नेमकं कोणाला धारेवर धरलं?
Ajit Pawar Beed Visit : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी सकाळीच बीडमध्ये दाखल झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचं स्वागत केलं. पालकमंत्री झाल्यावर अजितदादांचा हा पहिलाच बीड दौरा. या दौऱ्यात सकाळी दहा वाजता आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याचं खुद्द त्यांनीच उपस्थितांना सांगितलं.
'बीडच्या परिसरातील अनेक बातम्या वाचत आहोत. जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांवर कारवाई केली जाई. पण जिथं तथ्य नसेल तिथं कारवाईचा प्रश्न येत नाही' असं ते म्हणाले. उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांना उद्देशून 'बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे', असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदार असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये असा थेट इशारा त्यांनी दिला.
'काम करताना जातीपातीचा कधीच विचार करत नाही'
काम करत असताना मी जातीपातीचा विचार करत नाही, असं यावेळी अजित पवार यांनी सांगत कार्यकर्त्यांकडूनही अशाच कामाची अपेक्षा असल्याची बाब अधोरेखित केली. विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मकोका लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन असा सज्जड दम कार्यकर्त्यांना दिला.
बीडमध्ये अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीमध्येही दुरूस्ती करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. चुकचीच्या पद्धतींना आळा घातलाच गेला पाहिजे या वाक्यावर त्यांनी जोर दिला.
रिव्हॉल्वर, रिल आणि...
'मी बघतो, कोणी रिव्हॉल्वर काढतं, वर रिव्हॉल्वर उडवतात. कुणी त्या लावून फिरतं असं म्हणत जे कोणी रिव्हॉल्वर लावून फिरेल त्यांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत असं अजित पवार म्हणाले. रिव्हॉल्वर स्वसंरक्षणासाठी असून, तुमचे हे Reel वगैरे बनतात ते मी खपवून घेणार नाही. मी सर्वांना सरखा नियम लावणार आहे. कोणावर निशाणा साधायचा नाही, पण बदल झालाच पाहिजे', असा आग्रही सूर त्यांनी आळवला.
हेसुद्धा वाचा : जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल
'आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा. कोणावर अन्याय होणार नाही, आणि कोण भरडला जाणार नाही याच धर्तीवर कामं होतील', असं सांगत कोणाच्याही चुकीवर पांघरून घालणार नाही आणि 'मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका' अशा स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी आपला प्रत्येक शब्द उपस्थितांपर्यंत पोहोचवला. आपल्या उपस्थितीवर हार, तुरे, मूर्ती देण्यापेक्षा संतांचे विचार आचरणात आला असं म्हणत मोजक्या शब्दात पहिल्याच दौऱ्यात अजित पवार यांनी बीडमधील व्यवस्थेवर कटाक्ष टाकला.