इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला तोबा गर्दी, कोरोनाचे नियम पायदळी
पोलीस चौकीच्या समोरच हजारो लोक जमले कीर्तनाला
बीड : बीड जिल्ह्यात इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाला तोबा गर्दी झाली होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. केज तालुक्यातला नांदूरघाट गावात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पोलीस चौकीच्या समोर बाजार तळावरच हजारो लोक किर्तनाला आले होते.
झी २४ तासने हे वृत्त दाखवताच पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. मनसे जिल्हा संयोजकांवर कोरोना निमयांची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हे किर्तन आयोजित केलं होतं. सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांना यावेळी हरताळ फासण्यात आला. धार्मिक,राजकीय कार्यक्रमाला बंदी फक्त नावा पुरतीच आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
मनसेचे प्रशासनाला सवाल?
दरम्यान, निवडणुकांमध्ये मोठ्या प्रचारसभा सुरु असताना धार्मिक कार्यक्रमांवरच कारवाई का? असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष सुमन धस यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यात प्रचारसभा सुरु असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. राजकीय सभांना एवढ्या गर्दी चालते, पण आम्ही किर्तन सोहळा घेतला तर कारवाई होते. आमच्या धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी द्या अशी मागणी सुमंत धस यांनी केली आहे.