विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधला ललित साळवे चक्क विवाह बंधनात अडकला आहे. आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष...? पण ही आहे एका आगळ्या लग्नाची वेगळी कहाणी. बाईचा पुरूष झालेला ललित साळवे विवाह बंधनात अडकला. औरंगाबादमध्ये सीमा नावाच्या तरुणीशी त्याचं लग्न झालं. बौद्ध लेण्यांच्या परिसरात शुभमंगल पार पडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललित साळवे तो जन्माला आला तेव्हा तो ललित नव्हता. ती ललिता होती. बीडमधली ती पोलीस तरुणी. पण लिंग बदल करून पुरूष झालेली. तीच ललिता म्हणजे ललित साळवे. सध्या माजलगाव पोलिस दलात तो सेवा बजावतो आहे. लिंगबदल करण्यासाठी ललिताने जंग जंग पछाडलं.


न्यायालयीन लढा दिला, समाजाशी संघर्ष केला, लिंग बदलाची ऑपरेशन्स करून घेतली. अखेर पुरुष होण्याचं ललिताचं स्वप्न साकार झालं. आता तर पुरूष झालेल्या ललितने चक्कं सीमा नावाच्या तरुणीशी लग्न केलंय. औरंगाबादला बौद्ध लेण्यांच्या परिसरात ललित आणि सीमाचा विवाह पार पडला.


लिंग बदल ही भारतातली पहिली घटना नसली तरी समाजात अजून ती तितकीशी रुजलेली नाही. ललित साळवेने यानिमित्ताने नवी क्रांती घडवलीय. आता लग्न करून त्याने आणखी एक नवं पाऊल टाकलंय. 


माजलगाव इथे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या ललिता साळवे हिने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली होती. पुरुष बनल्यानंतर नोकरीत कायम ठेवावे अशी मागणी तिने केली होती. मुख्यमंत्र्यांनी विशेष परवानगी देत तिचा अर्ज मंजूर केला होता. त्यानंतर तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर गावात परतलेल्या ललितचं गावात जंगी स्वागतही झालं होतं. लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ललित साळवे पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाला.