भाजपला मोठा धक्का, बीड जि.प. विषय सभापती निवडीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व
बीड जिल्हा परिषद सदस्यांची फोडाफोडी करून गाजावाजा करून जिल्हा परिषद ताब्यात घेतलेल्या बीड भाजपला सभापती निवडीमध्ये माघार घ्यावी लागली आहे.
बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक झाली. या विषय समिती सभापती निवडणुकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. चारही सभापती पदांच्या निवडी बिनविरोध झाल्याने धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व दिसून आले. महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या रूपाने धनंजय यांनी हे वर्चस्व राखत माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. बीड जिल्हा परिषद सदस्यांची फोडाफोडी करून गाजावाजा करून जिल्हा परिषद ताब्यात घेतलेल्या बीड भाजपला सभापती निवडीमध्ये माघार घ्यावी लागली आहे.
धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजलगाव तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य जयसिंह धैर्यशील सोळंके, माजलगाव तालुक्यातील कल्याण आबुज यांची समाज कल्याण सभापती पदी, गेवराई तालुक्यातून भाजपच्या गटातून महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेल्या सौ. सविता बाळासाहेब मस्के आणि गेवराई तालुक्यातीलच शिवसेनेच्या यशोदाबाई बाबुराव जाधव यांची महिला व बालकल्याण सभापती पदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकासआघाडी झाली आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ३२ विरुद्ध २१ अशी बीड जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाली. आता धनंजय मुंडे यांनी भाजपला शह देत मागील फोडाफोडीचा वचपा काढला होता. त्यानंतर आज झालेल्या सभापती निवडीमध्ये तर संख्याबळ पाहून भाजपने माघार घेतल्याने सर्व विषय समित्यांवर धनंजय मुंडे यांचा वरचष्मा दिसून आला.