ना मंगलाष्टका ना विधी...`वंदे मातरम्`वर पार पडला विवाहसोहळा
मंत्री धनंजय मुंडे यांची या अनोख्या लग्नसोहळ्याला विशेष उपस्थिती होती.
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड: विवाहसोहळा म्हटलं की तामझाम आणि पारंपरिक पद्धतीनं विधीवत केलेलं लग्न आपण पाहिलं असेल. पण बीडमध्ये मात्र अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं लग्नसोहळा पार पडला असेल. या सोहळ्याची जगभरात चर्चा होत आहे. या लग्नात कोणतीही मंगलाष्टका नव्हती ना धार्मिक विधी झाले. मात्र तरीही दोघांनी एकमेकांना अगदी गुण्यागोविंदानं एकमेकांना स्वीकारलं आहे.
अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड पार पडला. HIV बाधित कुटुंबातील अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा नुकताच बीडमध्ये झाला. या विवाहसोहळ्याची केवळ गावातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा रंगली आहे.
धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राम येथे संपन्न झाला. यावेळी कोणत्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता नववधू आणि नवरदेवानं एकमेकांना हार घातले. वंदे मातरम् म्हणून हा विवाह संपन्न झाला.
विवाहसोहळ्यात अनेकदा धार्मिक विधी आणि मानपान आणि रीतीरिवाजाला महत्त्व दिलं जातं. लग्नसमारंभावर लाखो रुपये उधळले जातात. अशा परिस्थितीमध्ये या वेगळ्यापद्धतीनं पार पडलेल्या विवाहाची संपूर्ण चर्चा होत आहे.
हा विवाह सोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला. आपल्या आयुष्यात अनेक विवाहसोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले, परंतु या अनोख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले हे माझं भाग्यच असल्याची भावना मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
अनेक जण विवाह सोहळ्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी करतात सध्या कोरोनाचा काळ आहे. प्रशासनानं घालून दिलेल्या गाइडलाइन्सनुसार नियम पाळून कसं लग्न करता येऊ शकता याचा हे उत्तम उदाहरणच म्हणायला हवं. कमी खर्चात पण तितक्याच उत्साहात हा वेगळ्या पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला. त्याची चर्चा जगभरात होत असल्याचं पाहायला मिळत आहे.