परळीत डॉ. मुंडे हॉस्पिटलवर छापा, आरोग्य विभागाची मोठी कारवाई
डॉ. सुदाम मुंडेचा आणखी एक प्रताप समोर आला
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमध्ये गाजलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील डॉ. सुदाम मुंडेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. गर्भपाताच्या गंभीर गुन्हात जामिनावर बाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर छापा टाकण्यात आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने आरोग्य विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.
परळी शहरातील नंदा गौळ रोडवर डॉक्टर सुदाम मुंडे याचे हॉस्पिटल सुरूच होते. कोरोना रुग्णांसह गर्भपात करण्याचे संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.रात्रीपासून सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. आज सकाळी पासून परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे याने पुन्हा बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू होता. याची माहिती आरोग्य विभागाला लागली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
काय आहे मूळ प्रकरण?
दरम्यान, परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात बीड जिल्हा न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे आणि पीडितेचा पती महादेव पटेकरला दोषी ठरवले. न्यायालयाने डॉ. मुंडे दाम्पत्याने स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता, असं मत नोंदवत सर्व दोषींना 10 वर्ष सक्तमजुरी आणि 50हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. मुंडे यांच्या रुग्णालयात 2012 साली एका महिलेची गर्भलिंगनिदान चाचणी करण्यात आली असता पोटातील बाळ मुलगी असल्याची स्पष्ट झाले होते.
त्यावेळी डॉक्टरने कुठलाही रेकॉर्ड न ठेवता सरळ गर्भपात केला आणि त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण खूप तापले आणि पोलिसांनी परळी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध तसंच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी अधिक तपास केला असता डॉ. मुंडे याने याआधीही अनेक गर्भपात करून ती अर्भके प्लास्टिकच्या पिशवीत भरून स्वत:च्या शेतातील पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आले होते.