Dhananjay Munde, Beed Sanrpanch murder Case: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे वादाच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकरणावरुन गंभीर आरोप करत सर्वपक्षीय आमदारांच्या प्रतिनिधी गटाने राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाच दुसरीकडे याचसंदर्भात सोमवारी रात्री आधी धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटल्याने या प्रकरणात आता काय होणार अशी चर्चा असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी सदर प्रकरणामध्ये सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतल्याचं वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिलं आहे.


अजित पवारांना भेटल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री धनंजय मुंडे यांच्यात तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, धनंजय मुंडेंनी बीड प्रकरणातील आपली अजित पवारांसमोर मांडली. विरोधकांनी केलेल्या आरोपावर मुंडेंनी अजित पवारांसमोर खुलासा केला. या सर्व घटनाक्रमाशी आपला काहीही संबंध नसल्याचे मुंडे यांनी अजित पवारांना सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या भेटीनंतर बोलताना, "मी माझ्या विभागातील कामांसंदर्भात अजित पवार यांची भेट घेतली. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही," असं सांगितलं. पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर धनंजय मुंडेंनी, "संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणं योग्य नाही," असं म्हटलं. 


अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले


धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर दाखल झाले. जवळपास 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीदरम्यान बीड प्रकरणाची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच या सर्व भेटीगाठीनंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा दिल्याच्या बातम्याही काही प्रसारमाध्यमांनी दिल्या. अजित पवार आता या प्रकरणावर काय निर्णय देणार? खरंच मुंडेंनी राजीनामा दिला का? याबद्दल काल रात्रीपासून चर्चा सुरु असतानाच बीड प्रकरणी अजित पवारांनी आपली भूमिका निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


अजित पवारांची भूमिका काय?


बीड प्रकरणात जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई केली जाणार नाही, अशी भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही असं सांगण्यात येत आहे. तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल, त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. हीच अजित पवारांची सोमवारच्या भेटीगाठींनंतरची भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेनंतर ही भूमिका घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.