बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार...सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी
Beed Communal Conflict : बीडमध्ये जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. इथं दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. एका समाजाने तर चक्क बैठक घेत दुसऱ्या समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणाच केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गावातल्या मंदिराच्या पारावर गावकरी जमले असून ही एका समाजाची बैठक आहे. या बैठकीत दुसऱ्या समाजावर बहिष्कार (Boycott) घालण्याचं आवाहन केलं जातंय.
बैठकीत काय ठरलं?
या बैठकीत काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले. यात दुसऱ्या समाजाच्या दुकानात जायचं नाही. दुसऱ्या समाजाच्या महाराजाला कीर्तनाला बोलवायचं नाही. त्यांच्या चहाच्या टपरीवर, बिअर बार, हॉटेल, मेडिकलमध्ये जायचं नाही. जो कुणी या नियमाचं उल्लंघन करेल, त्याला 5 हजार रुपये दंड ठोठावला जाईल, अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून करण्यात येत होती
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जोरदार आंदोलन केलं. त्यामुळं सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतरच गावागावात दोन समाजांमध्ये दुहीचं बीज पेरलं गेल्याची चर्चा सुरू आहे. या व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी झी 24 तासची टीम मुंडेवाडी गावात पोहोचली.
तर एका समाजाच्या बहिष्कारामुळं दुसऱ्या समाजाच्या व्यवहारावर कसा परिणाम झाला, याचीही माहिती झी २४ तासनं नांदूर फाटा परिसरातून जाऊन घेतली. त्या समाजाने आमच्यावर बहिष्कार घातल्याने आमच्या वैयक्तिक जीवनावर काही परिणाम झाला नाही, पण उद्योगांवर परिणाम होऊ नये, असं एका दुकानदाराने सांगितलं. तर आधी आमचा व्यवसाय चांगला चालायचा पण या ताणतणावामुळे परिणाम झाल्याचं दुसऱ्या दुकानदारानेही मान्य केलं.
दरम्यान, मुंडेवाडीतल्या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर स्वतः गावात पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. कोणीतरी उत्साहाच्या भरात त्या बैठकीत बोललं, पण त्याला गावकऱ्यांनी एकमताने मान्यता दिलेली नाही. दोन्ही समाजात सुरळीत व्यवहार सुरु असल्याचं बीडच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.
गावागावात निर्माण झालेली ही सामाजिक दुही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारी नाही. जातीपातीच्या संघर्षातून हाती काहीच लागणार नाही. उलट गावागावात जातीय सलोखा नांदावा, यासाठी सगळ्यांनी एकोप्यानं राहण्याची गरज आहे.