वंशाला दिवा पाहिजे म्हणून दहावे बाळंतपण, महिलेचा मृत्यू
वंशाला दिवा पाहिजे म्हणून 7 मुली झाल्यानंतरही त्यांनी मुलाचा अट्टाहास सोडला नाही.
लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : 'वंशाला दिवा पाहिजे' ही संकुचित भावना आज 21 व्या शतकातही आपली पाठ सोडत नाही आहे. मुलींपेक्षा मुलगाच म्हातारपणाची काठी होतो अशा भ्रामक कल्पनेत जगणारी वृत्ती आजही आजुबाजूला दुर्देवाने पाहायला मिळते. वंशाच्या दिव्याचा अट्टाहास जीवापेक्षाही मोठा वाटणं, हे आजच्या काळातलं चीड आणणारं वास्तव. वरवरच्या उपायांनी ही मानसिकता बदलत नाही, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. वंशाच्या दिव्याचा अट्टाहास 7 मुलींना पोरकं करून गेलाय. 7 मुलींनंतरही मुलागा होण्याचा हव्यास महिलेच्या जीवावर बेतला आहे. मीरा एखंडे असे या मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा हवा म्हणून मीरा या दहाव्यांदा बाळंतपण करत होत्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बीडच्या माजलगाव इथे ही घटना घडली आहे. मीरा एखंडे या महिलेचे दहावे बाळंतपण माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात झाले. प्रसूतीनंतर या महिलेसह नवजात बालकाचा मृत्यू झाला. मीरा एखंडे यांना सलग सात मुली झाल्या. वंशाला दिवा पाहिजे म्हणून 7 मुली झाल्यानंतरही त्यांनी मुलाचा अट्टाहास सोडला नाही. याच काळात त्यांचा दोन वेळा गर्भपात करण्यात आला होता.
दहावे बाळंतपण
यावेळी मीरा एखंडे दहाव्यांदा गर्भवती राहिल्या. शुक्रवारी त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्याने माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहावे बाळंतपण असल्याने डॉक्टरही सतर्क होते. मात्र प्रसूतीनंतर त्यांना अती रक्तस्राव होऊ लागला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही त्यांना यामध्ये यश मिळाले नाही आणि मीराबाई आणि नवजात मुलाचा मृत्यू झाला. स्त्रियांकडे व्यक्ती म्हणून न पाहता, केवळ मुलांना जन्म देणारे यंत्र म्हणून पाहण्याच्या वृत्तीबाबत सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी चिंता व्यक्त केली आहे.