विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या गौतमी पाटीलची (Gautami Patil) जोरदार चर्चा आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे जणू समीकरणच झालंय. कधी राजकीय वजन दाखवण्यासाठी तर कधी लग्नाचा वाढदिवस म्हणून गौतमीचा कार्यक्रम ठेवणं ही आता फॅशनची झाली आहे. आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की तरुणाईची तुफान गर्दी ही आलीच. गौतमीची एक अदा पाहण्यासाठी जागा मिळाली नाही तर अगदी झाडावर, टॉवरवर किंवा घराच्या छतावर चढून तरुण मुलं कार्यक्रमाला गर्दी करतायत. गौतमीच्या डान्स आणि तिच्या सौंदर्याने तरुण घायाळ होतायत. आता तर पाटील आडनावावरुन वाद सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडच्या तरुणाकडून थेट लग्नाची मागणी
आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. पण यावेळी तिच्या कार्यक्रम किंवा आडनावामुळे नाही तर वेगळ्याच कारणाने ती चर्चेत आली आहे. बीडच्या (Beed) एका तरुणाने गौतमीला थेट लग्नाची मागणी घातलीय. (Marriage Proposal) बीडमध्ये राहाणाऱ्या या तरुणाचं नाव रोहन गलांडे-पाटील असं नाव असून तो 26 वर्षांचा आहे. रोहनने गौतमीला एक पत्र लिहिलं असून यात त्याने गौतमी तुझ्या इच्छा-अटी सर्वमान्य... बोल तू होती का माझी परी' असं लिहिलं असून यात त्याने आपल्या घराचा देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट असं म्हटलं आहे. 


रोहनचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी इथल्या रोहन गलांडे पाटील यांनी गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात पुढे म्हटलंय, 'गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी पण, तु होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगितलं होतंस' असं रोहनने म्हटलं आहे. 


'गौतमीच काय म्हणाली होती'
'आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून ईच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे' असं गौतमीने आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.


'तुझ्या सर्व अटी मान्य'
गौतमीची ही मुलाखत रोहनने ऐकली आणि त्याने गौतमीच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचं म्हटंलय.  'तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुणा लग्नाला तयार नसेल, तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे. दुग्ध व्यवसाय आहे. 'तु जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ये असं सांगत रोहनने आपल्या घराचा पत्ता दिला आहे. 


वराच्या शोधत असणाऱ्या गौतमी पाटील, बीडच्या या रोहन गलांडे पाटीलाला भेटायला जाणार का ? आणि त्याच्यासोबत लग्न करणार का ? हा उत्सुकतेचा विषय आहे.