कोल्हापूर : बेळगावच्या न्यायालयाने शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिलेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भिडे यांच्या विरोधात २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी म्हणजे काल होती. मात्र या सुनावणीस भिडे गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायाधीशांनी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येळ्ळूरमधील महाराष्ट्र मैदानावर १३ एप्रिल २०१८ ला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी भिडे हजर होते. त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती आणि भिडे यांनी त्या समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याबाबत आवाहन केले होते.


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या, विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवावी, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.