मुंबई : तुम्ही लोकशाही मानत असाल तर बेळगांवमध्ये येवून पाहा असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  केलंय. महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. शिवसेना खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित आहेत. बेळगांवमधील संयुक्त महाराष्ट्र चौकात ही सभा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री हे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी अत्याचार करत आहेत असे प्रचारात  सांगत आहेत. अत्याचार काय असतो ते पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बेळगावमध्ये येवून पाहावे असेही ते म्हणाले. तुम्ही ममता दीदी.. ममता दीदी म्हणत आहात.. आम्ही मोदी मोदी म्हणत आहोत असेही ते म्हणाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चूक केली असं म्हणता.. मग तुम्ही चूक दुरुस्त करा असेही राऊत म्हणाले.


चळवळीला सर्वात जास्त सुरूंग हा भारतीय जनता पार्टीने लावला आहे. नितीन गडकरी बेळगांवमध्ये येणार आहेत. एका मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी ते येतात हे चूक असल्याचे राऊत म्हणाले. हे चुकीचे आहे ते सगळ्यानी त्यांना सांगा असे ते म्हणाले.



हिंदुत्ववाची नाळ सांगता आणि दुसरीकडे शिवाजी महाराज यांचा पुतळा काढता ? असा प्रश्न उपस्थित करत आम्हाला आमची पाऊले वाकडी टाकायला लावू नका असेही राऊत म्हणाले.


बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ आणि सिंहाचा खेळ सुरू झालाय. त्यामुळे माकडांच अवघड झालं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार स्वातंत्र्य दिलंय. शुभमच्या नावाने हा लढा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आत्ता रक्त सांडणार, लाठ्या काठ्या खाणार नाही..पण आता झेंड्याच्या काठ्या हातात घेवू असे राऊत म्हणाले.


आम्ही पाणी बंद करू शकतो. आर्थिक नाड्या बंद करू शकतो.. पण आम्ही करत नाही.. कारण आम्ही माणुसकी बघतो. ही लढाई एकाची नाही... ही लढाई बेळगांवमधील लोकांची नाही. ही लढाई एकीकरण समितीची नाही. तर ही लढाई मराठी माणसाची असल्याचे राऊत म्हणाले.