मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-१९चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. कोविड-१९ चा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला, असे ते म्हणाले. 



सध्या खरीप परेणीचा हंगाम सुरु झाला आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी दोन हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा अकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात आठ हजार २०० कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली. 


ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारमंत्री पाटील यांनी केले. दरम्यान, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-१९ च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या असेही  पाटील यांनी यावेळी सांगितले.