ट्रेकिंग करतांना येऊ शकतो हृदयविकाराचा झटका सावधान
नाशिकमध्ये वीस वर्षीय तरुणाचा मृत्यूने हळहळ
सोनू भिडे, नाशिक- तरुण आणि जेष्ठ नागरिक सध्या आरोग्याबाबत सतर्क झाले आहे. आरोग्य चांगले रहावे याकरिता ते सर्वतोपरी उपाय करताना दिसून येतात. यासाठी जिम, जॉगिंग, आणि दुर्ग भ्रमंती सारख्या गोष्टीची क्रेझ तरुणांमध्ये वाढली आहे. मात्र हे सर्व करत असताना योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
नेमके घडले तरी काय
नाशिक शहराजवळील पेठ रस्त्याजवळ असलेला रामशेज किल्ला ... खरंतर सर्वसामान्य प्राथमिक ट्रॅकरसाठी सहजच पार होऊ शकणारा हा किल्ला ... मात्र ३० जुलै रोजी रामशेज किल्ल्यावर घडले भलतेच .. हिरवळ झाल्याने वर्षा पर्यटनासाठी आणि दुर्गभ्रमतीसाठी सरोवर कुटुंबीय रामशेज किल्ल्यावर गेले होते. सिडको परिसरात राहणाऱ्या या कुटुंबात तरुण सदस्य अजयला गड चढता चढताच चक्कर येऊ लागले आणि अस्वस्थ वाटू लागले.. काहीतरी होतेय हे समजण्याच्या आतच अजय उभा होता तिथेच कोसळला. स्थानिकांची मदत घेऊन त्याला तातडीने उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराचा झटका आल्याने अजयचा मृत्यू झाला
गेल्या काही वर्षांपूर्वी नाशिकमध्येच जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आहेत. गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
दुर्ग भ्रमंती करत असताना मृत्यू होण्याची कारणे
पर्यटक सध्या दुर्ग भ्रमंती करताना दिसून येतात. यात मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. दुर्ग भ्रमंती करत असताना आपले आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. मात्र काही पर्यटक या कडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम म्हणजे भ्रमंती दरम्यान शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. दुर्ग भ्रमंती करताना हृदयविकाराचा झटका येण्याची पुढील कारणे असू शकतात.....
प्रवास सुरु केल्यानंतर पर्यटकाला पोटात काही नसल्याने चक्कर येणे,
पायी चालण्याची सवय नसल्याने अचानक जास्त प्रमाणात पायी चालल्याने,
उन्हात प्रवास केल्याने शरीरातील पाण्याची मात्रा कमी होणे, शरीरातील शुगर कमी होणे याचा परिणाम हा मेंदूवर होतो.
मेंदूवरील प्रेशर वाढल्याने चक्कर येऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तसेच जास्त उंचीवरील वातावरण आणि जमिनी वरील वातावरणात मोठी तफावत असते. जितक्या उंचीवर जाणार तसे तसे ऑक्सिजन प्रमाण कमी कमी होत जाते त्यामुळे श्वास घेणे अवघड बनू लागते. अशावेळी कुठलाही जोर न लावता वा दुर्लक्ष न करता आहे तिथेच थांबणे आवश्यक आहे . अन्यथा याचा दुष्परिणाम आपल्या हृदयावर होत असल्याच मत सुयश हॉस्पिटलचे डॉ सुशील ओसवाल यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येकाने ट्रेकिंगच्या मोहिमेला सुरुवात करतांना आपल्या फॅमिली डॉक्टर यांना संपर्क करून सुरुवात करणे अत्यावश्यक आहे .
दुर्ग भ्रमंतीसाठी जाताना घ्यावयाची काळजी
अनुभवी जेष्ठ ट्रेकर संजय अमृतकर यांनी दुर्ग भ्रमंतीसाठी जाताना अगोदर जागेची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक असल्याचं म्हणतात. माहितगार माणसासोबत गेल्यास वेळेवर मदत मिळू शकते.तेथील वातावरण आपल्या शरीरीला अनुकूल असणार आहे का याची खात्री करणे, आपण तिथे गेल्यानंतर आवश्यक वस्तू उपलब्ध आहेत याची माहिती करून घेणे, चालण्याची सवय असणे गरजेचे आहे, त्याच बरोबर प्रवास सुरु करण्या अगोदर शुगर आणि ब्लडप्रेशर चेक करणे, पोट रिकामे नसावे, प्रवासात सुद्धा पाणी आणि फळ सोबत असावे जेणे करून भूक लागल्यास खाता येईल, सोबत जास्त वजनदार बॅग किंवा वस्तू ठेऊ नये जेणे करून गड किल्ले चढत असताना दम लागणार नाही. सुरुवातीला इमारतीतील काही मजले चढून आपल्याला दम लागतो का? ही प्राथमिक तपासणी प्रत्येकाने घरच्या घरी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच अशा साहसी दुर्गभ्रमंतीला जाणे हीतावह ठरेल.