स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई  : आता बातमी एका गावाची..... पनवेल जवळचं हे गाव रोज भाक-या तयार करतं. लग्नसराईच्या काळात एका दिवसात महिन्याला 20 हजार भाकऱ्या या गावात तयार होतात. पाहुया कुठलं आहे हे गाव.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तव्यावर फुगणारी ही गोल गरगरीत पांढरी शुभ्र भाकरी. भरल्या वांग्याची भाजी, झुणका, चिकन आणि मटणाचा झणझणीत रस्ता यांच्याबरोबर भाकरीचा झक्कास बेत जमून येतो. मुंबई आणि अख्ख्या कोकण पट्ट्यात तांदळाची भाकरी सगळ्यात जास्त लोकप्रिय..... रायगड आणि ठाणे जिल्ह्यात लग्नसमारंभांमध्येही तांदुळाच्या भाकरीला मोठी मागणी असते.


पनवेलजवळचं अख्खं एक गाव रोज भाक-या करतं. त्या गावाचं नाव तक्का. या गावात बहुतांश बायकांचा उद्योग म्हणजे भाक-या करणं. ओम साई महिला मंडळाच्या 40 महिला रोज भाक-या करुन विकतात. विशेषतः लग्नसराई सुरू झाली की या बायकांना उसंत नसते. रोज पाचशे ते दोन हजार एवढ्या भाक-या या गावात तयार होतात. लग्नसमारंभांमध्ये, घरगुती समारंभांमध्ये आणि हॉटेल्समध्ये या भाक-या पोहोचवल्या जातात. 


या गृह उद्योगाला आता 10 वर्षं झाली आहेत. गावातल्या सगळ्याच महिलांना मोठ्यामोठ्या भाक-या करता येत होत्या. याच कलेचा उपयोग त्यांना रोजगारासाठी झाला. गोल गरगरीत चंद्रासारखी ही भाकरी 15 रुपयांना मिळते.... त्यामुळे हजारोंची उलाढाल रोज या गावात होते. आधी हाताला चटके, तेव्हा मिळणारी ही भाकर, तक्का गावातल्या महिलांसाठी स्वयंपूर्णतेचं साधन ठरलीय.