प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : गेल्या काही दिवसांपासून सामुहिक सोहळ्यांपासून विविध कार्यक्रमांमध्ये विषबाधा (Food poisoning) होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यात (Bhandara) एका लग्नाला आलेल्या 200 पाहुण्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा भंडाऱ्यातच 70 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. एका नामकरण सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 जणांना विषबाधा


भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे नामकरण सोहळ्यात अन्नातून 70 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. जेवणानंतर दुसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार उघडकीस आलाय. नामकरण सोहळ्यासाठी आलेल्या लोकांना जेवणानंतर दुसऱ्या दिवशी हगवन आणि उलटयांच्या त्रास सुरु झाला होता. 


दुसऱ्या दिवशी सुरु झाला त्रास


विहिरगाव येथील एका व्यक्तीच्या घरी 18 डिसेंबरला त्यांच्या मुलाच नामकरण सोहळा होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते. नामकरण सोहळ्यानंतर आलेल्या लोकांनी जेवण केले. त्यानंतर पाहुण्यांना जेवणातून विषबाधा झाली. मात्र त्यावेळी लगेचच त्यांना त्रास जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी नामकरण सोहळ्यासाठी आलेल्या लोकांना हगवन आणि उलटयाच्या त्रास सुरु झाला.


यानंतर सर्वांनी रुग्णालयात धाव घेण्यास सुरुवात केली. या रुग्णांवर मोहाडी, तुमसर आणि भंडारा रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


लग्नाच्या जेवणानंतर 200 जणांना विषबाधा


भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी (sarandi) बुज येथे काही दिवसांपूर्वी रिसेप्शन सोहळ्यातील अन्नातून सुमारे 200 जणांना विषबाधा होण्याचा प्रकार समोर आला होता. रात्री जेवण केल्यानंतर काहींना त्रास व्हायला लागला तर अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयासह  प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.


अमरावतीमध्येही विषबाधा


अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एका साखरपुडा समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे शंभर ते दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली होती. अचलपूर येथील प्रहार पक्षाचे माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अष्टमासिद्धी येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जेवणातून अनेकांनी विषबाधा झाली. जेवणानंतर काही महिला, पुरुष व बालकांना अचानक मळमळ, उलट्या, ताप व अतिसाराचा त्रास होऊ लागला. यामुळे शंभर ते दीडशे नागरिकांनी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले.