प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : अभिनेता अजय देवगण याच्या दृश्यम चित्रपटाने सर्वांनाच चकित केले होते. पण दृश्यम चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखाच एक प्रसंग भंडारा पोलिसांसमोर (Bhandara Police) उभा राहिला आहे. चार वर्षांपूर्वी गायब झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी भंडारा पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे. मात्र या तरुणीचा खून झाल्याचे समोर आले आहे. तरुणीचा खून (Bhandara Crime) करणारे तीन आरोपी पोलीसांच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र अद्याप बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये कामाच्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या कवलेवाडा येथील अर्चना राऊत नावाच्या युवतीचा खून झाल्याचे उघड झाले आहे. मृतदेह सापडला नसला तरी साक्षीदाराच्या बयाणावरून तब्बल चार वर्षांनंतर गोबरवाही पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तिघांना गजाआड केले गेले आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेत पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या आदेशावरून गोबरवाही पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  आरोपींमध्ये संजय चित्तरंजन बोरकर (47), राजकुमार उर्फ राजू चितरंजन बोरकर ( 50 ) आणि धरम फागु सयाम (42) अशा तिघांचा समावेश आहे. तुमसर न्यायालयाने 31 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


नेमकं काय घडलं?


20 एप्रिल 2019 पासून अर्चना राऊत गायब असल्याची तक्रार तिचे वडील माणिक राऊत यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात दिली होती. अर्चना संजय बोरकर याच्या घरी कामावर गेली होती. पण ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने संजय बोरकर याच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी संजय बोरकर याने ती दुपारीच गेल्याचे सांगितले. पण अर्चनाच्या आईने मुलीची चप्पल आणि पिवळ्या रंगाची ओढणी तिथे पाहिली. याबद्दल विचारले असता आरोपी संजय बोरकर याने त्यांना हाकलवून लावले.


त्यानंतर राऊत कुटंबियांनी याबाबत गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. चार वर्षांनंतर या प्रकरणाचा तपास न लागल्याने गोबरवाही पोलिसांवर दबाव वाढला. त्यानंतर या घटनेतील एकमेव साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या गुप्त माहितीतून अर्चानाच्या क्रूर हत्येचे सत्य समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात दोन भावांसह तिघांना अटक केली आहे. मात्र अद्यापही पोलिसांना अर्चनाचा मृतदेह सापडलेला नाही. 


पोलिसांनी काय सांगितले?


"30 एप्रिल 2019 रोजी अर्चना राऊत ही तरुणी बेपत्ता झाली होती. याप्रकरणाची तक्रार दाखल झाली होती. कामाच्या ठिकाणावरुन ती परतलीच नव्हती. त्यावेळी तपास झाला होता पण त्यामधून काही समोर आले नव्हते. पण आम्हाला या प्रकरणात एक साक्षीदार मिळाला आहे. त्याच्या जबाबावरुन समोर आले की संजय बोरकर आणि त्याच्या साथीदारांनी अर्चनाची हत्या केली. त्यानंतर खाणीच्या परिसरात तिचा मृतदेह पुरला.   पण आता हत्या नेमकी कशासाठी झाली याचा तपास सुरु आहे. मृतदेह अद्याप आम्हाला मिळालेला नाही. डीएनएद्वारे आम्ही मृतदेहाची तपासणी करणार आहोत," अशी माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.