Bhandara District​ Prevent Child Marriage : गेल्या काही काळापासून अनेक ठिकाणी बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता बालविवाह रोखण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. या संबंधित प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच याप्रकरणी 1098 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. बालविवाहाबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक विवाह प्रथा असतात. आता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर अनेक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या विवाहसोहळ्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरुन बालविवाह प्रतिबंध आदेश जिल्हयात लागू करण्यात आले आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात होणारे बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 


पत्रिका छापणाऱ्यांवरही होणार कारवाई


भंडारा जिल्हयातील लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेसचालक, मंडप डेकोरेशन, चालक, फोटोग्राफर,आचारी, मंगल कार्यालय, लॉन सभागृह व्यवस्थापक, बँडवादक, कॅटरिंग चालक, विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेताना मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्याची खातरजमा करावी. त्यानंतरच विवाह समारंभाची बुकींग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.


माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय


त्यासोबतच बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपुर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करेल यामध्ये बालविवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो. या व्यक्तीला 2 वर्षापर्यंत सश्रम कारावासाच्या शिक्षा आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा केली जाईल. त्यासोबतच बाल विवाह संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच महिला आणि बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे.