दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भंडारा दुर्घटनेतील बाळांचा मृत्यू केवळ प्रशासनाच्याच बेपर्वाईमुळे झाल्याचं उघड झालं आहे. तब्बल 21 मिनिटं बाळं धुरात तडफडत रडत होती मात्र प्रशासन सूस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बाळं रडत होती पण त्यावेळी एकही नर्स उपस्थित नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी भंडारा रूग्णालय जळीत प्रकरणासंदर्भातली आहे. भंडारा दुर्घटनेतील बाळांचा मृत्यू केवळ आणि केवळ प्रशासनाच्याच बेपर्वाईमुळे झाल्याचं उघड झालं आहे. तब्बल 21 मिनिटं बाळं धुरात तडफडत होती. मात्र प्रशासन सूस्त पडून होतं. अखेर त्या दुर्दैवी 10 बाळांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.  शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यावर बाळ ठेवलेल्या आयसीयूने पेट घेतला. पण नर्सिंग स्टेशनमध्ये त्यावेळी एकही नर्स उपस्थित नव्हती.


खरंतर आयसीयूमध्ये नर्स उपस्थित असणं गरजेचं होतं पण आयसीयू तसंच नर्सिंग स्टेशनवरही नर्स उपस्थित नव्हती. अखेर २१ मिनिटं धुरात गुदमरून या बाळांचा मृत्यू झाला. कलिनाच्या डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजने सीसीटीव्ही फुटेज तपासणीतून हा धक्कादायक निष्कर्श काढला आहे.


वॉर्डात आग लागल्यावर तब्बल २१ मिनिटं इथे कोणीही फिरकलं नाही. सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार गंभीर बेजबाबदारपणामुळे बाळं जिवाला मुकली आहेत. नर्सेसच्या अनुपस्थितीमुळे बाळांना जिवाला मुकावं लागलंय. या संदर्भात पोलीस रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट उपलब्ध आहे. मात्र एफआयआर दाखल करण्यासाठी आणखी एका रिपोर्टची आवश्यकता असल्याचं सांगण्यात येतं आहे.