अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : भारत पे ( BHARAT PAY ) च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांच्या अकाऊंटवर डल्ला घालणं शक्य असल्याचं पुण्यातील एथिकल हॅकर्सनी ( ETHICAL HACKRES )दाखवून दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील श्रेयस गुजर, ओंकार दत्ता, शाहरुख खान आणि अम्रित साहू या चार जणांनी भारत पे ची वेबसाईट हॅक करून कंपनीचे ग्राहक असणाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट शिरकाव केला होता.


विशेष म्हणजे वेबसाइटच्या सुरक्षिततेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर भारत पे कंपनीने त्यांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत सजग असणं किती गरजेचं आहे ही बाब अधोरेखीत झालीय.


भारत पे ( BHARAT PEY ) कंपनी क्यूआर कोडच्या ( Q R CODE ) माध्यमातून आर्थिक व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देते. या कंपनीच्या संकेतस्थळात काही त्रुटी होत्या. या त्रुटी शोधून काढत पुण्याच्या त्या चार युवकांनी थेट ग्राहकांच्या खात्यात प्रवेश केला.


पुण्यातील त्या चार हॅकर्सपैकी श्रेयस आणि ओंकार हे सर्टिफाईड एथिकल हॅकर आहेत. संगणकीय प्रणाली, संगणकीय जाळ्यातील धोके किंवा त्रुटींचे निराकरण करून त्यांची सुरक्षितता वाढवणे हा एथिकल हँकिंगचा हेतू असतो.


श्रेयस गुजर याने याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून त्यातील त्रुटी दाखवून दिल्या होत्या. त्यानंतर आता त्याने भारत पे सारख्या नामांकित कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून त्रुटींची माहिती कंपनीला कळवली.


या त्रुटींची कंपनीने गांभीर्याने दखल घेत संकेतस्थळामध्ये तातडीने दुरुस्ती केली. या त्रुटी दाखवल्याबाबत कंपनीचे मुख्य व्यापार अधिकारी विजय अगरवाल यांनी आभार मानणारा ई मेल तसेच पारितोषिक देऊन या तरुणांचा गौरव केला.