`आज उद्या रूजू व्हा नाहीतर परवापासून बडतर्फीची कारवाई`, व्हिडीओ
अद्यापही कर्मचारी कामावरती रुजु न झाल्याने प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर कर्मचारी आजपासून कामावरती हजर राहणे अपेक्षीत होते. परंतु अद्यापही कर्मचारी कामावरती रुजु न झाल्याने प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. ही पगारवाढ एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषेदत एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतही उपस्थित होते.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आता प्रशासनाने 2 दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, आज आणि उद्या कामावर रूजू व्हा, नाही तर परवापासून बडतर्फीची कारवाई केली जाईल. निलंबित कर्मचारी कामावर परतल्यास निलंबन मागे घेतलं जाईल. मात्र रूजू झाले नाहीत तर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर भरती प्रक्रियेतील वेटींग लिस्टवरच्या कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. संपावर असलेले पण अजून निलंबन झालेलं नाही अशा कर्मचाऱ्यांवर परवापासून निलंबनाचा बडगा उगारला जाईल. असे देखील प्रशासनाने सांगितले आहे.
पगार वाढ देऊन ही कर्मचारी कामावर का परतले नाही?
राज्य सरकारने दिलेल्या निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने घोषणा केलेली पगारवाढ आमच्या हक्काची आहे, आमचा 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 असे दोन्ही करार प्रलंबित आहेत. त्यामुळे पगारवाढ तर आम्हाला मिळायलाच हवी, पण आमची विलीनीकरणाची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत. त्यामुळेच एसी कर्माऱ्यांनी हा संप मागे घेतला नव्हता, ज्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे अल्टीमेटम दिले आहे.