मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज दुपारी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविडची लागण झाल्याने त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, नुकतेच त्यांना घरी पाठविण्यात आले होते. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची अगदी सुरवातीपासून महत्वाची भूमिका होती.


सुधीर जोशी यांच्यावर उद्या सकाळी शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव त्यांच्या शिवाजी पार्कातील पारिजात निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 


'संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला' आणि लोभस असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. मुंबईचे माजी महापौर तरुण व तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. 


बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळ राहिले होते. १९६८ साली सुधीर जोशी प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता होते. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे ते महापौर झाले. सर्वांत तरुण महापौर म्हणून त्यांची गणना होते. 


१९६८ पासून ते विधान परिषद सदस्य होते. तर, १९९२-९३ दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तर, शिवशाही सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते.


संगीत, क्रिकेट व समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीरभाऊंच्या जीवनात पाहायला मिळतो. ते त्यांच्या 'आपुलकी' या मोठ्या गुणामुळे गुणीजनांत नि समाजात अतिशय आपलेसे झाले आहेत. त्यामुळेच स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी हे समीकरण पक्के झाले, वृद्धिंगत झाले.