मोठी बातमी! | कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी
उच्च स्तरावर ऑक्सिजन एक्सप्रेसची देखरेख
मुंबई : रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारली आणि कळंबोली ते विझाग आणि विझाग ते नाशिक पर्यंत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वीरीत्या चालविली. द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन टँकरच्या वाहतूकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वेद्वारा विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविण्यात आले. मुंबई विभागाच्या टीमने कळंबोली येथे फक्त २४ तासांत रॅम्प बनविण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे.
रो-रो सेवेच्या वाहतूकीसाठी रेल्वेला घाट सेक्शन, रोड ओव्हर ब्रिज, बोगदे, वक्र मार्ग, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, ओव्हर हेड इक्विपमेंट इत्यादी ठिकाणांच्या बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा बनवायचा होता. कारण उंची हि यातील महत्त्वाची बाब असल्याने रेल्वेने वसईमार्गे वाहतूकीचा नकाशा तयार केला. उंची ३३२० मिमी असलेले रोड टँकर टी1618 चे मॉडेल सपाट वॅगन्सवर ठेवणे शक्य असल्याचे आढळले. मुंबई विभागातील घाट विभागात ओव्हर डायमेंशनल कार्गो (ओडीसी) चालविण्याची परवानगी नसल्यामुळे वसईमार्गे जाणा-या दूरच्या मार्गाची निवड करण्यात आली होती.
ऑक्सिजन हे क्रायोजेनिक आणि घातक रसायन असल्याने, रेल्वेला अचानक वेग वाढवणे, कमी करणे हे टाळण्याच्या आवश्यकतेसह मध्येच दाब (प्रेशर) तपासणे आवश्यक असते, विशेषत: जेव्हा ते भरलेल्या (लोडींग) अवस्थेत असते. तरीही रेल्वेने हे आव्हान म्हणून स्वीकारले, मार्गाचे नकाशे तयार केले, लोकांना प्रशिक्षण दिले आणि विशिष्ट आकाराचे टँकर वसई, सूरत, भुसावळ, नागपूर मार्गे विझागमध्ये नेऊ शकले.
कळंबोली ते विझाग मधील अंतर १८५० किलोमीटरहून अधिक आहे जे या ट्रेनने साधारणतः ५० तासात पूर्ण केले. १०० टनांपेक्षा जास्त एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असलेले ७ टँकर १० तासात लोड केले गेले आणि केवळ २१ तासांत नागपुरात परत आणले गेले. काल नागपूरात रेल्वेने ३ टँकर उतरवले आहेत आणि उर्वरित ४ टँकर केवळ १२ तासांत नागपूरहून आज सकाळी १०.२५ वाजता नाशिकला पोहोचले आहेत.
लांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस २ दिवस तर रस्त्यामार्गे ३ दिवस लागतात. रेल्वेगाड्या २४ तास धावू शकतात परंतु ट्रक चालकांना थांबा इ. घेण्याची गरज असते. या टँकरच्या वेगवान वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केले गेले होते आणि हालचालींचे निरीक्षण सर्वोच्च पातळीवर केले गेले होते कारण आम्हाला माहित आहे की आपल्या राष्ट्रासाठी हा कठीण काळ आहे आणि राष्ट्र आमच्यासाठी सर्वोपरी आहे.
गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली.