डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 9 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला 10 दिवसात
डोंबिवलीमध्ये नऊ महिन्यांपूर्वी एका तरुणाची हत्या झाली होती. मात्र, तो अपघात दाखवण्यात आला होता. मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर 10 दिवसांत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Dombivli Crime News : गुन्हेगार कितीही चालाख असू दे अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच. डोंबिवली पोलिसांनी अशीच एक धडाकेबाज कारवाई कारवाई केली आहे. आरोपींनी हत्या करुन मृतदेह जाळून नष्ट केला. काहीच पुरावा नसताना 9 महिन्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कल्याण ग्रामीण परिसरातील हेदूटणे गावात ही हत्या झाली होती. टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या विजय पाटील आणि नितीन पाटील या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या संतोष करकटे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नऊ महिन्यां पूर्वी घडली होती. मात्र, या प्रकरणी या कामगाराची हत्या झाल्याचा संशय आल्याने मृताच्या कुटुंबाने या प्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी तब्बल 9 महिन्यानंतर हत्येचा उलगडा केला आहे.
मानपाडा पोलीस ठाणे यानंतर कल्याण क्राईम ब्रँच कडून याचा तपास सुरू होता. अखेर डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. एसीपी सुनील कुराडे यांच्या पथकाने नऊ महिन्यांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा दहा दिवसात करत याप्रकरणी विजय पाटील आणि नितीन पाटील या दोन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
कशी केली हत्या?
विजय आणि नितीन यांचे बेकायदा रिव्होलव्हर त्यांनी संतोषला संभाळण्यासाठी दिले होते. मात्र, संतोषच्या हातून ते गहाळ झाल्याने विजय आणी नितीन पाटीलने संतोषला खोलीत डांबून ठेवत आठ दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीत संतोषचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर अती दारू सेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे भासवत त्याच्यावर इलेक्ट्रिक शव दाहिनीत अंत्यसंस्कार करत आरोपींनी पुरावा नष्ट केला होता. मात्र, संतोषच्या कुटूंबियांनी मृत्युबाबत शंका उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपीना अटक केली. तर, त्यांना मदत करणारा तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित डॉक्टरने याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना न कळवल्याने हा डॉक्टर देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील उच्चशिक्षित गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा
आकर्षक परताव्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातील 250 पेक्षा जास्त नागरिक या आमिषाला बळी पडले आहेत. त्यांची सुमारे 300 कोटींची फसवणूक झाली असल्याचं सांगण्यात येतय. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या फर्मच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नावावर एकाच वेळी चार - चार बँकांमधून लाखोंचं कर्ज काढण्यात आलं आहे. ही कर्जाची रक्कम अधिक लाभासाठी गुंतवण्यात आली. मात्र, चांगला परतावा तर मिळालाच नाही, उलट गुंतवणूकदारांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटचा व्यवस्थापक प्रशांत शिंदे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.