Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेग
Sharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.
Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक घडामोडी घडणारा मतदारसंघ ठरतोय माढा आणि सोलापूर... अन् या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार... याची सुरुवात झाली ती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपने उमेदवारी दिल्यापासून... भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात शरद पवारांनी महादेव जानकरांना उभं राहण्यासाठी तयार केलं. मात्र महादेव जानकर हे शरद पवारांच्या गळाला लागण्याची चाहुल लागताच फडणवीस अॅक्शन मोडवर आले. फडणवीसांनी जानकरांना वर्षावर बोलवत मुख्यमंत्री तसंच अजित पवारांसोबत बैठक घेतली आणि महादेव जानकरांना परभणीतून लोकसभेचं तिकीट दिलं.
पवारांची चाल, धैर्यशील मोहिते पाटील पक्षात
शरद पवारांनीही मग आपली चाल खेळली. भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणलं. एवढंच नाही तर धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून पक्षाचं तिकीटही दिलं. रामराजे नाईक निंबाळकर वगळता सर्वच कुटुंबियांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला. फक्त धैर्यशील मोहिते पाटील यांनाच पवारांनी आपल्या पक्षात ओढलं नाही. तर धनगर समाजाचे नेते उत्तम जानकरांनाही आपल्याकडे खेचलं.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील यांनी मागील निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून एक लाखापेक्षा जास्त मतांचे अधिक्य दिले होते, त्यामुळे मोहिते पाटील यांच्यानंतर धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनीही साथ सोडणे, भाजपसाठी धक्कादायक होतं. धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांच्या रुपाने भाजपला हादरे बसल्यावर फडणवीस अॅक्टिव्ह मोडवर आले. माळशिरसमधील मोहिते पाटील विरोधी सर्वपक्षीय आघाडीला फडणवीसांनी महायुतीत खेचलं. त्यानंतर फडणवीसांनी पवारांपेक्षाही मोठा डाव खेळला. शरद पवारांचे अतिशय जवळचे मानले जाणारे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील महायुतीच्या वाटेवर असल्याचं समजतंय. अभिजीत पाटील भाजपात आल्यास मविआचे माढाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील तसंच सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी फटका बसण्याची शक्यता आहे.
अभिजीत पाटील यांची पंढरपूर तालुक्यात मोठी ताकद आहे. पंढरपूर तालुक्यातलं दीड लाख मतदान हे माढ्यात आहे, तर अडीच लाख मतदान हे सोलापूर लोकसभेत आहे. त्यामुळे शरद पवार आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका ठरण्याची शक्यता आहे. फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक अजून बाकीच होता. फडणवीसांनी थेट काँग्रेसच्या धवलसिंह मोहिते पाटील यांनाच गळाला लावलं. भाजप उमेदवाराला मदत करण्याचं आश्वासन धवलसिंह यांनी फडणवीसांना दिलंय.
कोण आहेत धवलसिंह मोहित पाटील?
धवलसिंह मोहिते पाटील हे सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचे ते चुलत भाऊ तर माजी खासदार प्रतापसिंह पाटील यांचे पूत्र आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांची माळशिरसमध्ये चांगली ताकद आहे. तेव्हा एक मोहिते पाटील शरद पवारांकडे गेल्यावर दुसरे मोहिते पाटील फडणवीसांकडे आले आहेत... त्यांचा भाजपला पाठींबा जाहीर करणं हा धैर्यशिल मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यासाठी धक्का समजला जातोय. आधी पवारांचा धक्का, मग फडणवीसांचा झटका.. त्यामुळे माढ्याच्या निमित्ताने पवार आणि फडणवीसांमधलं कुरघोडीचं राजकारण चांगलंच रंगलंय.