रायगड : मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर जामीनासाठी सुनावणी झाली. 


काय घडलं कोर्टात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे यांच्यासारखा जबाबदार व्यक्ती बेजबाबदारपणे वागला, तसंच त्यांच्या एका वक्तव्यामुळे सर्व अप्रिय घटना घडल्या, ज्या घटना घडल्या त्याला राणेच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टासमोर केला. तर पोलिसांकडूनही सात दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. यावर उत्तर देताना राणे यांच्या वकिलांनी अटकेपूर्वी नोटीस दिली नव्हती, राणे यांच्यावर अटकेसाठी जी कलमं लावली होती, ती चुकीची आहेत, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे दाखले दिले.


संपूर्ण राणे कुटुंब कोर्टात हजर


कोर्टात सुनावणी सुरु असताना नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे तसंच निलेश आणि नितेश राणे कोर्टात उपस्थित होते. 


महाडमध्ये तणावाचं वातावरण


महाडमध्ये राणे पोहोचताच प्रचंड राडा झाला. गाड्यांची तुफान तोडफोड करण्यात आली. शिवसैनिकांनी गाड्या फोडल्याचा आरोप राणे समर्थकांनी केला. राणे महाडमध्ये येणार म्हणून शिवसैनिकांची आणि राणे समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही बाजूनी प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. यामध्ये अनेक गाड्यांची जोरदार तोडफोड कऱण्यात आली. 


वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद पेटला


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याचं वक्तव्य केल्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली. राज्यात सकाळपासूनच शिवसेना-भाजप असा सामना रंगला. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. मुंबईत राणेंच्या निवासस्थानासमोर आणि चिपळूणमध्ये राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसमोर दोन्ही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि पोलिसांना त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.


राणेंच्या बंगल्यासमोर युवासेनेचं आंदोलन


राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू इथल्या बंगल्याबाहेर युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप आणि युवासेना कार्यकर्ते आपापासात भिडल्याचं पाहायला मिळालं. समोरासमोर आल्यानंतर युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 


नारायण राणे यांना अटक


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याचं आक्षेपार्ह वक्तव्य राणेंनी केलं होतं. याप्रकरणी नाशिक, पुणे आणि महाडमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राणेंना अटक करण्यात आली. तब्बल 2 तास संगमेश्वरच्या गोळवली इथं राणेंच्या अटकेचं नाट्य रंगलं. 


अटकेवेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आधी कार्यकर्त्यांना पांगवलं आणि नंतर राणेंना बाहेर काढलं. भाजप कार्यकर्त्यांनी राणेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. राणेंना आधी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथून त्यांना रायगड पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्यांना महाडमध्ये नेण्यात आलं. महाड पोलीस स्थानकात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणे यांना महाड कोर्टात हजर करण्यात आलं.


राणे यांच्या जीवाला धोका, प्रसाद लाड यांचा आरोप


भाजप नेते प्रसाद लाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. नारायण राणे जेवत असताना पोलिसांनी जेवणाचं ताट ओढून घेतलं असं प्रसाद लाड यांनी म्हटलं 'तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असं आम्ही पोलिसांना सांगितलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होतं, त्यांना ECG करायचा होता, त्यांना काहीही करु दिलं नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचलं, पोलिसांनी अजूनही अटक दाखवलेली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले


नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीने सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरु आहे ते पाहता आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर बोलताना संयम राखणं महत्वाचं आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्याने वासरू मारलं तर आम्ही गाय मारू अशा प्रकारे सरकार वागतंय. सरकारला खुश करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरु असून पोलिसांनी कायद्याने काम करावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.