बिहारमध्ये शिवसेनेला नोटापेक्षा कमी मते
बिहार निवडणुकीत शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली असून नोटाला १. ७४ टक्के मते मिळाली आहेत.
मुंबई : बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. एनडीए जरी सध्या पुढे असली तरी देखील अनेक जागांवर कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या तासाभरात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. मात्र, हे कल हळूहळू बदलत गेले. सध्या बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचं चित्र दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान निवडणूकीत शिवसेनेनं देखील बिहारमध्ये २२ जागांवर उमेदवार उभे केले होते. पण शिवसेनेला हवं तसं यश मात्र मिळालं नाही.
त्यामुळे महाराष्ट्र भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांचा हा निर्णय फेल ठरला आहे. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणूकीत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विट करत भातखळकर म्हणाले, 'बिहारमध्ये सोनिया सेनेला नोटापेक्षा कमी मते मिळाली. निवडणूक चिन्ह म्हणून बिस्किटच बरे होते विनाकारण तुतारीची लाज काढली.' असा टोला त्यांनी लगावला आहे. बिहार निवडणुकीत शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली असून नोटाला १. ७४ टक्के मते मिळाली आहेत.
धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले आहे. पण बिस्किट या चिन्हावर शिवसेनेने निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेला तुतारी हे चिन्ह दिलं होतं.