अरूण मेहेत्रे, झी मीडिया पुणे : पुण्यात एसटी बसमधून कोट्यवधींची रक्कम चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी 72 तासांत या गुन्ह्याची उकल केली आहे. मात्र एव्हढी मोठी रक्कम एसटीनं नेण्यात आल्यानं अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी म्हणजे सामान्यांची जीवनवाहिनी. गोर-गरीब, सामान्य जनतेच्या प्रवासाचं मुख्य साधन. पण याच एसटीतून कोट्यवधी रूपयांची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. तीन दिवसांपूर्वी पोलीस असल्याची बतावणी करून काही चोरट्यांनी तब्बल 1 कोटीची रक्कम चोरली. 


मात्र, पोलिसांनी 72 तासांत मुद्देमाल हस्तगत गेला आहे. पाटस टोल नाक्याजवळ एसटी बसमधून कुरियर कंपनीचे पैसे घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आलं होतं. यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रूपये किमतींचा ऐवज होता. 



डिजिटल व्यवहार होत असतांना इतकी मोठी रक्कम बसने मुंबईला का नेली जात होती?, लाखो रुपयांचा महसूल वाचविण्यासाठी हा चोरटा पर्याय निवडला जातोय का? कुरियरच्या नावाखाली एसटीतून हवाल्याच्या रकमेची वाहतूक होत होती का? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 


या प्रकरणात एकूण सहा आरोपी असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन जण अद्याप फरार आहेत. त्यांनी लुटीची रक्कम ऊसाच्या शेतात लपवून ठेवली होती. यापूर्वीही खासगी ट्रॅव्हल्स मधून मोठ्या रकमांची वाहतूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण आता अवैध कामांसाठी चोरट्यांची लालपरीवर नजर पडलीय हेच यातून अधोरेखित होत आहे.