BJP 5th Candidate List : भाजपने पाचवी यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील युवा नेते राम सातपुते यांना (Ram Satpute) सोलापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुनील मेंढे यांना भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अशोक महादेवराव नेते यांना गडचिरोली-चिमूर मधून तिकीट देण्यात आलंय. अशोक नेते गेले दहा वर्ष गडचिरोलीचे खासदार आहेत. एकीकडे माढाच्या जागेवरून वाद सुरू असताना भाजपने सोलापूरात (Solapur LokSabha) सावध खेळी केल्याचं पहायला मिळतंय. सोलापूरच्या जागेवर राम सातपुते या युवा तरुण आमदाराला तिकीट दिल्याने आता सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते यांच्यात लढत पहायला मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या पाचव्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कंगना मंडीमधून निवडणूक लढवेल. तर बेगुसरायमधून गिरिराज सिंग यांची उमेदवारी निश्चित झालीये. तसेच पटना साहिबमधून रवी शंकर प्रसाद लढतील. त्याचबरोबर सुल्तानपूरमधून मेनका गांधी यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने पाचव्या यादीत एकूण 111 उमेदवारांची नावं निश्चित केली.



अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास राहिलेल्या राम सातपुते यांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून राम सातपुते यांना ओळखलं जातं. अशातच आता राम सातपुते यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आता सोलापूरची लढत आणखीच रंगल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचं तगडं आव्हान राम सातपुते यांच्यासमोर असणार आहे.


दरम्यान, भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगना राणौतला उमेदवारी दिली आहे, तर यूपीच्या पिलीभीत मतदारसंघातून वरुण गांधी यांचं तिकीट कापण्यात आलंय. तर छोट्या पडद्यावर 'श्रीरामाची' भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल यांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.


कंगना राणावत म्हणते...


भाजपने माझं नाव लोकसभेची उमेदवार म्हणून जाहीर केलं. माझं जन्मस्थळ असलेल्या हिमाचलच्या मंडी या ठिकाणाहून मला उमेदवारी देण्यात आली आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा बहुमान. मी एक चांगली कार्यकर्ता होईन आणि लोकसेवेसाठी काम करेन, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.