जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : भाजपच्या महामेळाव्यासाठी नागपुरातून मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी विशेष गाडी सोडण्यात आली. मात्र, ती विशेष गाडी कार्यकर्ते स्टेशनवर पोहोचायच्या आधीच निघून गेली... भाजप कार्यकर्त्यांची गाडी कशी सुटली पाहूया हा रिपोर्ट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पक्षाचा महामेळावा मुंबईत होणार आहे. त्यासाठी नागपूरवरून कार्यकर्ते मुंबईकडे येणार होते... त्यांच्यासाठी विशेष गाडी अजनी रेल्वे स्थानकातून सुटेल अशी सूचना त्यांच्या नेत्यांनी दिली. सकाळी साडे दहा वाजता गाडी सुटेल असं सांगण्यात आलं. त्यासाठी साडे नऊ वाजता कार्यकर्ते स्टेशनवर पोहोचले. मात्र, स्टेशनवर पोहोचल्यावर गाडी साडे आठ वाजताच निघून गेली होती.


त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून दुसऱ्या ट्रेनची सोय करण्यात आली. दुसऱ्या ट्रेनची जुळवाजुळव करताना तब्बल पाच तास लागले, अशी माहिती भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी दिलीय.  
 
या संपूर्ण प्रकरणात भाजप नेत्यांनी रेल्वे प्रशासनाला दोषी ठरवलं आहे. नियोजित वेळ ही साडे दहाची असताना कोणतीही पूर्वसूचना न देता साडे आठला गाडी रवाना केल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.


मुंबईतील मेळाव्यासाठी विदर्भातून चार विशेष गाड्या भाजपतर्फे बुक करण्यात आल्या होत्या. नागपुरातून जाणाऱ्या गाडीसाठी २६ लाख रूपये प्रशासनाला अदा करण्यात आले. हा गोंधळ लक्षात आल्यावर वर्ध्यातून सुटणारी गाडी नागपूरसाठी वळवण्यात आली.  


मेळाव्याआधीच भाजप कार्यकर्त्यांची गाडी चुकल्यामुळे कार्यकर्ते मात्र काहीसे नाराज झाले होते.