नागपूर : नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पाणी दरवाढीवरून सत्ताधाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहे. नागपूर महापालिकेने पाण्याचे दर ५ टक्क्यांनी वाढवल्याच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी आज मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षासमोर मूक निदर्शनं  केलीत.  भाजप नगसेवकांनी पाणी दरवाढ रद्द करावी असे फलक घेवून ही मूक निदर्शनं केलीत. जनतेवर वाढीव दरांचा एकदम बोजा पडणार नाही यासाठी पाणी पुरवठ्याचे दर दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढवावे असे 2017 मध्ये ठरले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, 2020मध्ये कोरोना येईल हे कोणालाच माहित नव्हतं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जनता आधीच आर्थिक संकटांचा सामना करत असताना या वर्षी 5 टक्क्यांची दर वाढ जनतेवर लादणे योग्य होणार नसल्याचे सांगत भाजप नगरसेवक आजआयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनात उतरले. 


हातात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दरवाढीच्या निर्णयाचा विरोध करत भाजप नगरसेवकांनी शांततेत आंदोलन केलं. यावेळी वाद होऊन वातावरण बिघडू नये म्हणून पोलिसांनी तुकाराम मुंढे यांच्या दालनासमोर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
 
तुकाराम मुंढे जोवर केलेली दरवाढ मागे घेणार नाही तोवर रोज अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत राहू असा निर्धार ही भाजपने व्यक्त केला आहे. 


दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी केलेली दरवाढ शासनाच्या नियमानुसार असून ती मागे घेणे शक्य नसल्याचे सांगत ते या मुद्द्यावर माघार घेणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पाण्याच्या दरावरून  नागपूर महापालिकेचा भाजप विरुद्ध मुंढे हा वाद पुढे ही सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे.