नाना पटोले यांना अटक करा, नितीन गडकरी यांनी का केली मागणी?
भाजप आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद उभा राहिला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.
मुंबई : Nitin Gadkari on Nana Patole : भाजप आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद उभा राहिला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मी काहीही बोललो नाही, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे. भाजप विरोधात नाना पटोले आधीपासून आक्रमक आहेत. त्यांनी संधी मिळेल त्यावेळी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Union Minister Nitin Gadkari has demanded the arrest of Nana Patole)
पंतप्रधान मोदी यांच्यावरील वक्तव्याने नाना पटोले वादात घेरले गेले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने 16 जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सभेत पटोले यांनी 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो', असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजप आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
व्हिडिओनंतर भाजप नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेसवाल्यांच्या मनात एवढा द्वेष आहे की ते पंतप्रधानांना मारण्यापर्यंत बोलत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हे वक्तव्य अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह आहे. काँग्रेस पक्षाच्या या विधानाचा पंजाबमध्ये झालेल्या घटनेशी संबंध आहे का?, असा सवाल संबित पात्रा यांनी केला आहे.
मी पंतप्रधान मोदींबाबत असे म्हटले नाही - पटोले
"मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं 5 वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्षं झाली राजकारण करतोय. पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदी यांना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभे आहे...."
दरम्यान, प्रचारसभेदरम्यान आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, तर मोदी नावाच्या एका गावगुंडाबाबत बोललो, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलेय.