कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विरोधक एकवटले
भाजप-मनसेच्या नेत्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
आतिष भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार, रुग्णवाहिका सेवा, विनाविलंब उपचारासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
महापालिकेतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी कोरोनाचा वाढता आकडा काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या अनेक पदाधिकारी आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, मनसेचे माजी आमदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी महापालिकेतर्फे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच शंभर ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून प्रत्येक प्रभात दहा ऍम्ब्युलन्स ठेवण्यात येतील असे सांगितले.