सावकरांविषयीच्या अपमानजनक वक्तव्यानंतर विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून सत्ताधारी आणि विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले जाते.
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे उद्यापासून नागपूरात सुरु होणाऱ्या अधिवेशनातही याचे जोरदार पडसाद उमटणार, हे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशनाला सामोरे जाणार आहेत. परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून सत्ताधारी आणि विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले जाते. मात्र, बहुतेकदा विरोधक या चहापानावर बहिष्कारच टाकताना दिसतात. यंदा भाजपनेही हाच कित्ता गिरवला आहे.
उद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज, सोनियांशीही चर्चा करणार
हुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपवर पलटवार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उपरोधिकपणे उल्लेख केला होता. सत्य बोलण्यासाठी मला माफी मागायला सांगितली जात आहे. मात्र, तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपसोबत शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाले होते. आम्ही गांधी आणि नेहरूंचा आदर करतो. त्याप्रमाणे तुम्हीही सावरकरांचा आदर करा, असे संजय राऊत यांनी राहुल गांधींना ठणकावून सांगितले होते.
शिवसेना आणि भाजपच्या विचारसरणीत असलेल्या फरकामुळे ते एकत्र कसे नांदणार, असा प्रश्न यापूर्वी अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, आम्ही किमान समान कार्यक्रमाच्याआधारे सर्वकाही निभावून नेऊ, असा दावा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केला होता. मात्र, राहुल यांच्या विधानामुळे आता या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.