औरंगाबाद: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधली वातावरण आतापासूनच प्रचंड तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी औरंगाबादमधली मेळाव्यात शिवसेनेवर जळजळीत शब्दांत टीकास्त्र सोडले. महाविकासआघाडी सरकार मुस्लिमांना खुश करण्यासाठी त्यांना पुन्हा आरक्षण देत आहे. शिवसेना त्यांच्या दाढ्या कुरवाळण्याचे काम करत असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार कुठल्या कायद्याने मुस्लिमांना आरक्षण देत आहे, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला. तसेच हे पाच टक्के आरक्षण न्यायालयात टिकूच शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनाचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. आता ते मुख्यमंत्रीही झाले आणि मुलालाही मंत्री केले. मात्र, यासाठी ते मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, त्यांच्या दाढ्या कुरवाळत आहेत. त्यामुळे आता शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? केवळ भाजपच औरंगाबादचे रक्षण करू शकते. शिवसेनेचे हे बेगडी हिंदुत्व लोकांना समजावून सांगा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.


राज्यात सत्तेपासून वंचित राहावे लागल्यानंतर चवताळलेल्या भाजपने औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आज चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. 


या बैठकांनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराची मागणी केली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी केले.