गेले काही दिवस राज्यातील सत्तासंघर्षाचे केंद्र गुवाहाटी बनलेलं असताना एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली होती. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या काय झाडी काय डोंगर या डायलॉगची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु आहे. या डायलॉगवर एक गाणं ही तयार करण्यात आले आहे. मात्र आता याच गाण्यावर महाराष्ट्र काँगेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही नाना पटोले यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. नाना पटोले यांना टॅग करत काय नाना तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं असे कॅप्शन दिले आहे. 



नाना पटोलेंनी उत्तर द्यावे - चित्रा वाघ
"पब्लिक डोमेनमध्ये जोपर्यंत एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत ती खासगी असते. एकदा ती सार्वजनिक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची आपल्याला मुभा आहे. त्यामुळे सगळेच प्रश्न विचारतात. मीच प्रश्न विचारला अशातला भाग नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी उत्तर द्यावे," असे चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे.



व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नाना पटोले चेरापुंजी, मेघालय येथे हॉटेलमध्ये एका महिलेसोबत खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे फोटोही जोडण्यात आले आहेत. सोबत काय झाडी काय डोंगर हे गाणेही जोडण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले असल्याचे म्हणत तो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.


नाना पटोलेंचे स्पष्टीकरण


दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. नाना पटोले यांनीही याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात कायदेशीर सेलद्वारे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. बदनाम करण्याचे हे कटकारस्थान आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका असणार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.