भाजप नगरसेवकाची वृद्ध महिलेला मारहाण
जांभ्या दगडानं भरलेली गाडीला बाजू देण्याच्या वादातून या नगरसेवकानं वृद्ध महिलेला शिवीगाळ करत बेदम मारहाण
गुहागर : गुहागरमध्ये भाजपच्या नगरसेवकानं लज्जास्पद काम केल्याने स्वत:वर रोष ओढवून घेतला आहे. क्षुल्लक कारणावरून त्याने एका वृद्ध महिलेला जबर मारहाण केली आहे. गुहागरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जांभ्या दगडानं भरलेली गाडीला बाजू देण्याच्या वादातून या नगरसेवकानं वृद्ध महिलेला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यात महिलेला जबर मार बसला असून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसात तक्रार
अरुण रहाटे असं मारहाण करणाऱ्या नगरसेवकाचं नाव असून त्याच्या सोबत त्याचा मुलगा आणि अन्य एका व्यक्तीनं देखील या वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. भाजपा नगरसेवकाच्या या गुंडगिरी कृत्यामुळे गुहागरमध्ये संतापाचे वातावरण आहे. या नगरसेवकाच्या विरोधात पीडित महिलेच्या मुलाने गुहागर पोलिसात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.