राज्यात सत्ताबदल व्हावा यासाठी भाजपने... चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना चंद्रकांत खैरे यांचा अजब दावा
Maharashtra Politicsl Crisis : शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीमुळे आठवडाभरापासून राज्यात महाभारत सुरू आहे. उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक असा संघर्ष उभा राहिला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि आव्हान-प्रतिआव्हान दिलं जात आहे.
यातच आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे. गुवाहाटी इथं लपून बसलेल्या बंडखोर आमदारांवर 7 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून देवेंद्र फडणवीस यांनी हा खर्च केल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
तसंच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख दाढी असा करत आधी रिक्षावाला असलेल्या या एकनाथ शिंदे यांच्याकडे एवढा मोठा पैसा आला कुठून असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थित केला आहे. तुम्हांला यायचं असेल तर या नाहीतर तुमची हकालपट्टीच काय सगळीच पट्टी करून टाकू असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
दीपक केसरकर हे गद्दार असल्याचं देखील खैरे म्हणाले. आज बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी एक अजब दावा केला. एकनाथ शिंदे यांना जादूटोणा येतो, गुवाहाटीला असलेल्या आमदारांवर जादूटोणा करण्यात आल्याचं खैरै यांनी म्हटलं आहे.