बीड: बीडमधील जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शनिवारी भाजपचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिरसाट यांनी भाजपच्या योगिनी थोरात यांचा पराभव केला. या निवडणुकीत शिवकन्या शिरसाट यांना ३२ मते मिळाली. तर योगिनी थोरात यांना २१ मते मिळाली. राज्य स्तरावरील समीकरणे बदलल्याने शिवसेनेने यापूर्वीच बीड जिल्हा परिषदेत भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भाजपचा पराभव अटळ मानला जात होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडीच वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण पंकजा मुंडे यांनी सत्ताचक्र फिरवली आणि भाजपची सत्ता स्थापन केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे पक्षावर नाराज आहेत. मध्यंतरी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात त्यांनी शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल येण्याआधीच पंकजा मुंडे यांनी मैदानातून सपशेल माघार घेतली होती. आपण केवळ लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकीच्या  रिंगणात उतरणार असल्याचे पंकजा यांनी म्हटले होते. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत, असे पंकजा यांनी म्हटले होते.



औरंगाबाद जिल्हा परिषदेतही भाजपचा पराभव


औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांना ३०-३० अशी समान मते मिळाली. अखेर या दोघींच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्यात आला. यामध्ये मीना शेळके यांची चिठ्ठी आल्याने अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.