अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : राज्यातील गर्भवती महिला आणि एक ते तीन वयोगटातील लहान बालकांना देण्यात येणाऱ्या हरभरा हा निकृष्ट दर्जाचा असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या खात्यातील पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला. लहान बालकांना वाटण्यात आलेले हरभरा पाकीट घेऊन त्यांनी आज अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयात धडक देत हे गंभीर आरोप केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील गर्भवती माता आणि लहान बालकांना पोषण आहार म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाडीच्या माध्यमातून त्याचे वाटप केले जात आहे. अशातच एका अंगणवाडीमधून चिमुकल्यांना देण्यात आलेले हरभरे हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनिल बोंडें यांनी उजेडात आणले आहे. 


कोरोनाच्या काळात वाटलेले हे हरभरे निकृष्ट दर्जाचे असून या हरभऱ्यांना छिद्र पडले आहेत. ते हरभरे शिजलेही जात नाहीत त्यामुळं ते हरभरे आता अधिकऱ्यानी शिजवावे असं बोंडे म्हणाले. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी झाली पहिजे अशी मागणी त्यांनी केली.


 


बालक आणि गर्भवती मातांना महाराष्ट्र शासनाकडून चांगल्या दर्जाचा हरभरा देणं गरजेचं असल्याचा मुद्दा अधोरेखित करत याच हरभऱ्याच्या माध्यमातून सर्वात मोठा भ्रष्टाचार हा खिसे गरम करणाऱ्या मंत्र्यांच्या कारकिर्दीत झाला असा गंभीर आरोप बोंडे यांनी केला. त्यामुळं याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीच थेट त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं.