BJP Leader Claim About Actor Govinda And Dawood Ibrahim: आपल्या अभिनयाने आणि नृत्यकौशल्याने हिंदी चित्रपटसृष्टीमधील 90 चं दशक गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा अहुजाने गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. हाती भगवा घेत गोविंदाने आपली नवीन राजकीय इनिंग सुरु केली आहे. मात्र या पक्षप्रवेशानंतर दोन दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ नेत्याने गोविंदावर यापूर्वी केलेल्या गंभीर आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत भाजपा नेत्याने गंभीर आरोप केल्याने आता या विषयावरुन शिंदे गट आणि भाजपा आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मी गोविंदाला मित्र म्हणणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, 'गोविंदाला मी मित्र म्हणणार नाही असं सांगतानाच शिंदे गटात गेलेल्या या अभिनेत्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहे,' असा दावा केला आहे. तुमचे मित्र गोविंदा यांनी तुमच्या मित्रपक्षात प्रवेश केला आहे. त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न राम नाईक यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राम नाईक यांनी, "माझा आणि त्यांचा परिचय आहे. तरी पण त्यांना मी मित्र नाही म्हणू शकणार. ते माझ्याविरुद्ध निवडणूक लढले आणि जिंकले होते," असं म्हटलं. पुढे बोलताना राम नाईक यांनी गोविंदा यांनी अनेकदा राजकारण सोडत असल्याची घोषणा करत पुन्हा नव्याने पक्षात प्रवेश केल्याचा खोचक टोला लगावला. "एक रुखरुख माझ्या मनात आहे. ते खोटं बोलतात की काय असं मला वाटतं. कारण आता त्यांनी दोनदा, तिनदा राजकारण सोडलंय असं सांगितलं होतं. पण ते उमेदवार म्हणून जाहीर झाल्याशिवाय मी त्यांच्याबद्दल आणखीन काही बोलणार नाही," असं राम नाईक म्हणाले.


मी 7 ते 8 वर्षांपूर्वीच लिहिलेलं आहे


याच मुलाखतीमध्ये राम नाईक यांना, तुम्ही एक आरोप केला होता की निवडणूक जिंकण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती. त्या आरोपावर तुम्ही आजही ठाम आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राम नाईक यांनी मी स्वत: पुस्तकात तसा उल्लेख केला असून या दाव्याला मागील 7 ते 8 वर्षात कोणीही आव्हान दिलेलं नाही असं सांगितलं. "कमाल आहे! त्या आरोपावर आव्हान द्यायला ते (गोविंदा) आले नाहीत. इतक्या वर्षात त्यांचे कोणी मित्र आले नाहीत. हे मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ते पुस्तकसुद्धा प्रकाशित होऊन 7 ते 8 वर्ष होऊन गेली," असं राम नाईक यांनी म्हटलं.