नवी दिल्ली : 'मधल्या कालखंडामध्ये मी अनुभवले त्यावरुन मला राजकारणाची घृणा वाटू लागल्याने मी लोकसभा लढवणार नसल्याचेट भाजपातील असंतुष्ट नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपुर्वीच म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या वक्तव्याला पंधरा दिवसही उलटले नसताना त्यांनी आपल्या मनातील खदखद आज पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. भाजपा ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका अमेरिकन हॅकरनं केला होता. त्यानंतर हा दावा तथ्यहीन असल्याचे भाजपा सरकारने स्पष्ट केले. नेमक्या याच मुद्यावरुन एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला उलट प्रश्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


2014 च्या निेवडणूकीत ईव्हीएम मशिन हॅक केली गेल्याचा दावा अमेरिकन हॅकरने केला होता. याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना माहित होते म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचे खळबळजनक वक्तव्यही त्याने केले होते. यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धरले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी जोर धरु लागली. निवडणूक आयोगाने असे करण्यास साफ नकार दिला. पण या साऱ्या प्रकारात सरकारच्या विश्वासआर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात विरोधकांना थोडेफार यश आले. हॅकरच्या आरोपात तथ्य नसल्याचे सरकारला वारंवार स्पष्ट करावे लागले.


आता यासर्वामध्ये एकनाथ खडसेंची खदखद महत्त्वाची आहे. अमेरिकन हॅकरचा दावा फोल ठरवणाऱ्या सरकारने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी माझे संभाषण झाल्याचा दावा करणारा मनीष भंगाळे हा देखील हॅकरच होता. मग त्यावेळी सरकारने असे का म्हटले नाही ?, असा सवाल करत खडसेंनी स्वकियांवरच निशाणा साधला आहे. आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.


शनीची साडेसाती 


 मी परिस्थितीला दोष देत नाही, कदाचित माझंही चुकंल असेल. पण शनीची साडेसाती लागल्याचे सांगत शनी कोण आहे याबद्दल माहिती असल्याचेही ते म्हणाले. मधल्या कालखंडामध्ये मी अनुभवलं त्यावरुन मला राजकारणाची घृणा वाटू लागली आहे. पण अशा घाणेरड्या राजकारणाचा मला वीट आल्याचेही ते म्हणाले. विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवलं नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांमध्ये दु:ख केवळ माझ्याच वाट्याला आली असं दु:खही त्यांनी व्यक्त केलं. लोकसभेत भाजपला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येतील याकडे आमचे सध्या लक्ष आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करेल. विधानसभा जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही हा विचार त्यावेळी घेईन असेही ते म्हणाले.