महावितरणचा एकनाथ खडसेंना शॉक, लॉकडाऊनमध्ये आलं एवढं बिल
कोरोना लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
जळगाव : कोरोना लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही महावितरणने शॉक दिला आहे. लॉकडाऊनदरम्यान खडसेंच्या जळगावमधील मुक्ताईनगरमधल्या घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा ४ महिन्यांसाठी हे बिल आहे.
या बिलानंतर लॉकडाऊनदरम्यान आलेली अवास्तव असून ती न भरणारी असल्याचं खडसेंनी म्हणलं आहे. सरकारने या वीज बिलांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या बिलांमध्ये सवलत द्या, तसंच लोकांना वेठीला धरण्याचं काम करू नका, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
दरम्यान वीज बिलांच्या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोप केले आहेत. 'महावितरणकडे पगार द्यायलाही पैसे नव्हते. ठाकरे सरकारने आम्ही पैसे देणार नाही, असं सांगितलं. तेव्हा मंत्रालयात जादा वीज बिल पाठवण्याचा कट शिजला,' असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
उर्जा विभागाने २० हजार कोटींची लूट केली आहे. जुलै महिन्याचा मीटर रीडिंगला स्थगिती द्यावी, तसंच चुकीची बिलं पाठवली म्हणून राज्य सरकारने माफी मागावी आणि खोटी बिलं पाठवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ४० टक्के मीटर रीडिंग घेतलीच नाहीत, आमच्याकडे अशी १०० वाढीव वीज बिलं आहेत, ही बिलं आम्ही उर्जामंत्र्यांकडे पाठवणार आहोत आणि राज्यपालांनाही भेटणार आहोत, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.