प्रसाद काथे,मुंबई: भाजपाचे मालेगाव लोकसभेतील बंडखोर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज आपल्याच पक्षावर बॉम्बगोळा टाकलाय. चव्हाण यांनी दावा केलाय की, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाप्रवेशाची ऑफर देण्यात आलीय. हरिश्चंद्र चव्हाण झी २४ तासच्या 'रोखठोक' या लोकप्रिय चर्चात्मक कार्यक्रमात बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चव्हाण यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की त्यांना तिकीट नाकारण्याचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. भाजपाच्या तळागाळातील जबाबदाऱ्या पार पाडत उत्तर महाराष्ट्रात पक्ष वाढवल्याचा दावा त्यांनी केला. तसंच, उमेदवारी दिल्यास आपण पराभूत होऊ असा कुठला सर्वेच नसल्याचंही ठासून सांगितलं. 


महाराष्ट्राचे सिंचन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की, हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं पक्षाकडून केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. यानिमित्ताने, खासदार चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले. गिरीश महाजन संकटमोचक मंत्री नसून एक दिवस ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी संकट ठरतील असे उद्गार त्यांनी काढले.


दरम्यान, रोखठोक कार्यक्रमात सहभागी झालेले भाजपा प्रवक्ते मधू चव्हाण यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्ष बदलण्याची भूमिका खासदार चव्हाण यांनी घेऊ नये. त्यांची समजूत काढली जाईल असा विश्वासही प्रवक्ता मधू चव्हाण यांनी व्यक्त केलाय.