नगर : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे वादग्रस्त विधानासाठी नेहमी चर्चेत असतात. ऊसदर आंदोलकाच्या भेटीसाठी गेलेल्या दानवे यांनी आताही वादग्रस्त असे विधान केले आहे.


आंदोलकांच्या भेटीला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. पण, ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे, असे विधान रावसाहेब दानवेंनी केले आहे. हे विधान असंवेदनशील असल्याची टीका सर्वबाजूने होत आहे. 


'पायावर गोळी मारु शकले असते'


ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी रावसाहेब दानवे हे नगर जिल्ह्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी जखमी आंदोलकांशी संवाद साधला. दरम्यान ‘गोळीबार हा काही छातीवर करायचा नसतो. परंतु, जमावामध्ये अशाप्रकारे जी गोळी लागली, ती चुकीची मारली गेली. पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले. 


'पहिलाच गोळीबार'


 मुख्यमंत्र्यांनी गृहखातं सांभळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार आहे. अशाप्रकारचा गोळीबार पुढच्या काळात होणार नाही, अशी खात्री ते बाळगतील. आमची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी या विषयावर आम्ही चर्चा करु’, असेही रावसाहेबांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची किंवा गृहखाते वेगळे करण्याची गरज नसल्याचेही स्पष्टीकरणही दानवे यांनी दिले.


जखमेवर मीठ चोळले 


या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. रावसाहेब हे नक्की जखमींना दिलासा देण्यास आले होते की जखमांवर मीठ चोळण्यास आले होते ? असा प्रश्न विचारला जात आहे. 


लाखाची मदत 


दरम्यान रावसाहेब दानवे यांनी ऊस दर आंदोलनातील जखमींना आर्थिक मदत दिली आहे. गोळाबारातील दोघा जखमींना प्रत्येकी एक लाख आर्थिक मदत येऊ असे आश्वासन दिले आहे.