डीजे मारहाण प्रकरणात भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
डीजे वाजवण्यास नकार दिल्यानं दोन डीजे ऑपरेटर तरुणांना अमानुषपणे मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार
किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : नाशिकमधील डीजे ऑपरेटर मारहाण प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनाही या प्रकरणात सह-आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडितांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलीय.
नाशिकच्या दरी मातोरी येथील एका फार्म हाऊसवर वाढदिवसाची पार्टी सुरू असताना धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला होता. रात्री दहा वाजेनंतर डीजे वाजवण्यास नकार दिल्यानं दोन डीजे ऑपरेटर तरुणांना अमानुषपणे मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
अधिक वाचा : डीजे वादकांना कडाक्याच्या थंडीत नग्न डांबून विजेचा शॉक, दंडूका-पट्ट्याने मारहाण
आमदार देवयानी फरांदे आपल्या पदाचा गैरवापर करत संशयित आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडिताच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केलाय. याबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, डीजे मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी ताब्यात घेतल्यावर त्यातील काही सराईत गुन्हेगार तर काही राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळणदेखील लागलं असून शनिवारी याबाबत नाशिक शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे.