धस यांनी दिलेला पेन ड्राईव्ह, अजित पवारांचा वाढलेला आवाज अन्.. 73 कोटींवरुन बैठकीत सन्नाटा

Suresh Dhas Pen Drive To Ajit Pawar: पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदार उपस्थित असतानाच धस यांच्या एका कृतीने बैठक सुरु असलेल्या सभागृहात एकच शांतता पसरली.
Suresh Dhas Pen Drive To Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री झाल्यावर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस ,आमदार संदीप क्षीरसागर ,खासदार बजरंग सोनवणे या बैठकीला उपस्थित आहेत. याच बैठकीमध्ये आमदार सुरेश धस यांनी सर्वांसमोर अजित पवारांकडे एक पेन ड्राईव्ह दिल्यानंतर सभागृहामध्ये एकच शांतता पसरली. या पेन ड्राईव्हचं कनेक्शन धनंजय मुंडे आणि 73 कोटी रुपयांच्या निधीशी असल्याचं माहिती सुत्रांनी दिली आहे.
काय आहे त्या पेन ड्राईव्हमध्ये?
खरं तर जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्यापूर्वीच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेल्या बोगस कामांची यादी धस यांनी माध्यमांसमोर मांडली होती. धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केला होता. आपण हा सर्व प्रकार अजित पवारांच्या निदर्शनास आणून देणार आहेत, असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत खडाजंगी दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच खरोखरच सुरेश धस यांनी या प्रकरणासंदर्भातील एक पेन ड्राईव्ह अजित पवारांना बैठक सुरु असताना सर्वांसमोरच दिला.
अजित पवार मोठ्या आवाजात बोलताच...
आमदार सुरेश दस यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना झालेल्या घोटाळ्याबाबतचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये अजित पवारांकडे दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. धस यांनी कथित घोटाळा प्रकरणाचे पुरावे पेन ड्राईव्हमधून अजित पवारांकडे दिल्यानंतर बैठक सुरु असलेल्या सभागृहामध्ये शांतता पसरली. पेन ड्राईव्ह अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतर सभागृहात कुजबूज सुरु झाली. त्यानंतर अजित पवार मोठ्या आवाजात बोलताच सभागृात कमालीची शांतता पसरल्याचं दिसून आलं. अजित पवारांनी धस यांनी दिलेलं पेन ड्राईव्ह आपल्या ताब्यात घेतलं.
नक्की वाचा >> '...तर मी लगेच राजीनामा देईन'; पक्षाच्या बैठकीत अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंची ऑफर
अजित पवारांचा बैठकीपूर्वीच धस यांना दणका
अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वीच ज्येष्ठ आमदारांना दणका दिला. जिल्हा नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार नमिता मुंदडा यांची नेमणूक अजित पवारांनी केली आहे. ज्येष्ठ आमदार असलेल्या सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांचा पत्ता या समितीचे सदस्य म्हणून कट करण्यात आला आहे. सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर व इतर सदस्य केवळ लोकप्रतिनिधी म्हणून बैठकीला उपस्थित आहेत.