सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्ववर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. भाजप नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपने संधी दिली तर आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. जयसिध्देश्ववर महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला जात पडताळणी समितीने आज अवैध ठरवला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रमोद गायकवाड यांच्या तक्रारी नंतर सुनावणी होऊन दाखला अवैध झाला. 


यामुळे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्ववर महास्वामी यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. उच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणी महास्वामी दादा मागणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव त्यांनी केला होता.



या निकालानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपात प्रवेश केलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना या निकालाबाबत माहिती मिळाली. आपण पोटनिवडणुक लढवण्यास तयार आहात का ? असा प्रश्न केला असता. मला भाजपने संधी दिली तर मी तयार आहे. अशी माहिती माजी मंत्री ढोबळे यांनी दिली.


माजी मंत्री ढोबळे राष्ट्रवादीत असताना त्यांनी विविध महत्त्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात ढोबळे यांचे वेगळे अस्तित्व आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा आणि मोहोळ या विधानसभा मतदारसंघात त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 


उत्कृष्ट वक्ता आणि मतदारसंघाची जाण असलेला बहुजन नेता म्हणून ढोबळे हे भाजपसाठी तगडे उमेदवार ठरू शकतात. मात्र यासाठी खासदार  डाॅ जयसिध्देश्ववर महास्वामी यांचा दाखला पुढील प्रक्रियेतही अवैध ठरल्यानंतरच पोटनिवडणुक लागेल.