भाजपकडून मनसेला युतीची ऑफर ! सत्तेत सहभागी होणार? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
भाजपनं मनसेला युतीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मनसे पदाधिकारी बैठकीत संभाव्य युतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
BJP MNS Alliance : भाजपने मनसेला युतीची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच ऑफरबद्दल मनसे पदाधिकारी बैठकीत विषय चर्चेला होता अशी माहिती समोर येत आहे. मात्र, या युतीच्या ऑफरबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्राशी प्रतारणा होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी मनसेकडून घेतली जाईल असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे. भाजपप्रणित महायुतीमध्ये मनसेचं इंजिन सामील होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रातील त्रिशूळ सरकारमध्ये लवकरच चौथा भिडू सामील होणार
महाराष्ट्रातील त्रिशूळ सरकारमध्ये लवकरच चौथा भिडू सामील होणार आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला लवकरच एक्स्ट्रा इंजिन लागणार आहे. हे इंजिन असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं. राज ठाकरेंच्या मनसेला भाजपनं युतीची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसे पदाधिका-यांच्या बैठकीत हा विषय चर्चेला आल्याची माहिती समोर आलीय.
भाजपकडून आपल्याला युतीसंदर्भात ऑफर आहे. आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल अजित पवारही महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यांचं काय करणार? त्यामुळं आपण अजून कुठल्याही निर्णयापर्यंत आलेलो नाही, असं राज ठाकरेंनी बैठकीत पदाधिका-यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यावर्षी महापालिका निवडणुका होणारच नाहीत. थेट लोकसभा निवडणुकाच लागतील, असा दावाही राज ठाकरेंनी केला आहे.
भाजपचं सध्या एकच लक्ष्य आहे. 2024च्या लोकसभा निवडणुका जिंकणं. त्यादृष्टीनं भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादीला महायुतीत सामील करून घेण्यात आलं. आता मनसेच्या रुपानं महायुतीमध्ये चौथा पार्टनर घेऊन लोकसभा विजयाची हॅटट्रिक करण्याची तयारी भाजप नेतृत्वानं केली आहे. मध्यंतरी शिंदे-फडणवीसांसोबत राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. मात्र मणिपूरच्या मुद्यावरून भाजपसाठी अडचणीची भूमिका घेणारे राज ठाकरे महायुतीत सामील होणार का, याकडं सगळ्यांचंच लक्ष लागल आहे.
राज ठाकरे यांची भूमिका भाजपाच्या जवळ जाणारी; रोहित पवार यांची टीका
राज ठाकरे यांची भूमिका भाजपाच्या जवळ जाणारी असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. गेल्या लोकसभेच्या काळात राज ठाकरे हे प्रखरपणे लोकांचे प्रश्न मांडत होते. मात्र आता त्यांची भूमिका भाजपाच्या जवळ जाणारी असून पूर्वीचे राज ठाकरे कधी दिसणार असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.